"अॅस्पायर फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६" साठी प्रस्तावांची छाननी व निवड प्रक्रिया पार पाडण्यासाठी तज्ज्ञ समितीची स्थापना करण्यात येईल. या समितीमध्ये सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी, राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त सेवानिवृत्त शिक्षक व मुख्याध्यापक यांचा सन्माननीय सदस्य म्हणून समावेश असेल. तसेच शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती सदस्य म्हणून कार्य करतील आणि अॅस्पायर फाउंडेशनचे कर्मचारी तांत्रिक सहाय्यक म्हणून काम पाहतील.
आलेल्या सर्व प्रस्तावांची छाननी व शिक्षकांची निवड पारदर्शक पद्धतीने करण्यात येईल. सर्व प्रस्तावांची डिजिटल नोंद एक वर्षासाठी जतन करून ठेवण्यात येईल.
नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद तसेच राज्य किंवा केंद्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सन्माननीय शिक्षकांनी कृपया या पुरस्कारासाठी नामनिर्देशन प्रस्ताव दाखल करू नयेत — यामुळे अद्याप संधी न मिळालेल्या गुणवंत, मेहनती व उपक्रमशील शिक्षकांना वाव मिळेल.
राज्य किंवा केंद्र शासनाचे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक "अॅस्पायर फाउंडेशन राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६" संदर्भात दूरध्वनी किंवा ई-मेलद्वारे मार्गदर्शन व सूचना देऊ शकतात.
प्राथमिक स्तरावर निवड झालेल्या शिक्षकांनी सादर केलेली माहिती व पुरावे, संबंधित शिक्षक ज्या शाळेत कार्यरत आहेत त्या शाळेशी संपर्क साधून पडताळून पाहण्यात येतील. त्यानंतरच अंतिम निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
तसेच, प्रस्ताव दाखल करणाऱ्या प्रत्येक शिक्षकाला अंतिम निवड यादी ई-मेल आणि व्हॉट्सअॅपद्वारे पाठविण्यात येईल.