शिक्षण हा समाजाच्या विकासाचा मजबूत पाया आहे. शिक्षक हे विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्याचे महत्त्वाचे काम करत असतात. चांगले संस्कार, ज्ञान आणि योग्य मार्गदर्शन देऊन ते देशाचे आदर्श नागरिक घडवतात. त्यामुळे समाज आणि राष्ट्राच्या प्रगतीमध्ये शिक्षकांचे योगदान खूप मोठे आहे. इतर अनेक व्यवसायांमध्ये निवृत्तीनंतर व्यक्तींना "माजी" म्हणून ओळखले जाते, पण शिक्षक मात्र आपल्या विद्यार्थ्यांच्या मनात आयुष्यभर "माझे शिक्षक" म्हणून कायम राहतात. हेच शिक्षकांच्या कार्याचे महत्त्व दाखवून देते.
आजचे विद्यार्थी हे उद्याचे देशाचे भविष्य आहेत. त्यांना सक्षम आणि संस्कारक्षम बनवण्यासाठी राज्यातील अनेक शिक्षक प्रामाणिकपणे आणि सेवाभावी वृत्तीने काम करत आहेत. अनेक शिक्षक नवीन उपक्रम राबवून शिक्षणाची गुणवत्ता वाढवत आहेत. अशा शिक्षकांचा गौरव करण्यासाठी शासन आणि विविध संस्था आदर्श शिक्षक पुरस्कार देतात. मात्र, अनेक चांगले आणि मेहनती शिक्षक या पुरस्कारांपासून वंचित राहतात आणि त्यांच्या कार्याची माहिती समाजापर्यंत पोहोचत नाही.
या पुरस्कारासाठी राज्यभरातून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. अॅस्पायर फाउंडेशनची तज्ज्ञ समिती सर्व प्रस्तावांची तपासणी करून विविध निकषांच्या आधारे राज्यातील १०० शिक्षकांची "राज्य आदर्श शिक्षक" म्हणून निवड करेल. तसेच प्रत्येक जिल्ह्यातील १० शिक्षक असे एकूण ३६० शिक्षकांची "जिल्हा आदर्श शिक्षक" म्हणून निवड करण्यात येईल.
याशिवाय, प्रत्येक तालुक्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना "तालुका आदर्श शिक्षक" पुरस्कार देण्यात येतील. तसेच विशेष कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना "विशेष आदर्श शिक्षक पुरस्कार" देऊन सन्मानित करण्यात येईल.
ऑनलाईन पद्धतीने नामनिर्देशन प्रस्ताव दाखल करणाऱ्या इतर सर्व सहभागी शिक्षकांनाही पुरस्कार सोहळ्याचा दिवशी मंचावर मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येईल
या उपक्रमातून उपक्रमशील शिक्षकांच्या चांगल्या कामाची माहिती समाजापर्यंत पोहोचवणे, त्यांना प्रोत्साहन देणे आणि शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणणे हा अॅस्पायर फाउंडेशनचा मुख्य उद्देश आहे. तसेच निवडक शाळांना शालेय उपयोगासाठी डिजिटल साहित्य देणगी स्वरूपात दिले जाईल.